Oct 09

सप्तशती गुरूचरित्र :: अध्याय सदतीसावा

श्री वासुदेवानंद सरस्वती (टेंबे स्वामी) रचित "श्री सप्तशती गुरूचरित्र"


गृह भूमी संमार्जन । कीजे नित्य लेपरंजन । शालग्रामशिला धेनू । गृहीं राखून ठेवा गव्य ॥१॥
गृह त्वादे गृहमेधीय । अग्निहोत्र किंवा गुह्य । हो संध्यावत्‌ देवपूज्य । पशुतुल्यत्व अन्यथा ॥२॥
किंवा प्रातर्विस्तरानें । दुपारी पंचोपचारानें । सायंकाळीं निरांजनें । आठ स्थानें पूजनाची ॥३॥
जे कोणी न पूजती । ते यमदंड घेती । वेदमंत्रे द्विज पूजिती । पौंराणोक्तीं स्त्रीशूद्रादि ॥४॥
विपि नां तोत्थ मध्यम । क्रीत हीन, स्वीय उत्तम । तसीं श्वेत रक्त श्याम । पुष्पें अधम शूद्रानीत ॥५॥
न द्या देवा सकृमिछिद्र । दुर्गे दुर्वा, केवडा हरा । वर्जा तुळशी गणेश्वरा । धुत्तुरार्कादि कृष्णा ॥६॥
वाम हस्ताकडे कलश । पुष्पादिका दक्षिण देश । शंख घंटा वामदक्षिणेस । कीजे न्यास देही देवी ॥७॥
कायें मानसें वाचें द्विजा । षोडशोपचारे पूजा । मिळतां पंचामृतें पूजा । स्नानापूर्वीं नंतर भूषा ॥८॥
तवाश्रित मी मला तारीं । म्हणूनी निर्माल्य घे शिरीं । भावें मंत्रजप करीं । तीर्थ पी शिरी घे उद्वासी ॥९॥
घे अंतःकरणीं देवा । पंचसूना दोष जावा । जरी तरी वैश्वदेवा । प्रातःसायं स्वान्नशुध्यर्थ ॥१०॥
याचे प्रातःकालारंभण । होम करी तो देवयज्ञ । हो बळी तो भूतयज्ञ । पितृनृयज्ञ तत्तर्पणें ॥११॥
वीक्षणार्थ अतिथीसी । किंचित् ठरा अंगणदेशीं । येतां अन्न द्या शक्तीसी । द्या यतीसी सजलांन्न ॥१२॥
ओले पाद मुखकर । जेवा घेउनी परिवार । नेणत्यासी वाढा दूर । नच करा पंक्तिभेद ॥१३॥
घालून चित्राहुति । आपोशन घ्या मौंनस्थिति । घ्याव्या मंत्रे प्राणाहुति । पात्र हातीं धरुनिया ॥१४॥
सर्वांस प्राणाहुत्यंत । मौंन पुढें विकल्पित । पात्रीं टाका न उच्छिष्ट । जल पितां शब्द वर्ज्य ॥१५॥
दीप मावळतां न खावें । रजस्वलांत्यां न देखावें । त्यांचे शब्द न ऐकावें । न शिवावें परस्पर ॥१६॥
दुर्वायु अधो आतां । अन्न त्यजा कीटयुक्ता । न जेवावें वांती होतां । केश पडता प्रोक्षुनि घ्यावे ॥१७॥
वियुक्तः स्याद् द्विजत्वात्स । पलांडुलशुनादिभुक् । तामसाहारभुग्दुर्धीः । सात्विकाहारभुक्सुधीः ॥१८॥
आज्या पयोन्न लवण । सर्व खावें अन्य अन्न । सशेष द्यावें उच्छिष्टान्न आपोशन । अर्धे प्यावें ॥१९॥
मुखाचा शोधनासी । वर्जावें तर्जनीसी । मुख हस्ताघ्री शुचीसी । द्विराचमनें बोलीयेलें ॥२०॥
ध्यासम्यक् तांबुलादि । ऐकावें पुराणादि । कीजे सायंसध्याविधी । भोजनांदि पूर्ववत्‌ ॥२१॥
क्षीरान्न रात्रीं शस्त । दिवाकर्म प्राक्प्रहरांत । रात्रौं वर्जा सौंरपाठ । निशींथांत रात्रिकर्म ॥२२॥
जैं पञ्च यज्ञादिकचुके । कीजेप्रायश्चित्तविवेके । सुखशायिनिशां वंदा, सुखें । निजाईशाअर्पूनकर्म ॥२३॥
स्त्रीऋतु कालीं करा रति । पर्व मूल मघा रेवती । वर्जा दिवा श्राद्धव्रती । ऋतुगामी ब्रह्मचारी ॥२४॥
न गुर्विणीशीं रमांवें । रतीं कोप द्वेष त्यजावे । ऋतु चुकवूनी न जावें । जातां पावे भ्रूणहत्या ॥२५॥
घर धंदा होतांहि विप्रा । न सोडावें निजाचारा । गुरु ऐसें कथिती विप्रा । तो आचार करुनि तरे ॥२६॥
इति श्रीमत्परमहंसपरिव्राजकाचार्यश्रीमद्वासुदेवानंदसरस्वतिविरचिते सारे आन्हिककर्मनिरुपणं नाम सप्तत्रिंशोऽध्यायः

 

श्री गुरुदेव दत्त...!!!

Oct 08

सप्तशती गुरूचरित्र :: अध्याय छत्तिसावा

श्री वासुदेवानंद सरस्वती (टेंबे स्वामी) रचित "श्री सप्तशती गुरूचरित्र"


त्या ग्रामामध्यें एक । विप्र येक होता रंक । भावें करी आन्हीक । हो विवेकशून्यता तत्स्त्री ॥१॥
तो नेम धरुनी परान्न । सोडी, दंपती भोजन । द्याया आला महाजन । स्त्री जाऊनीं प्रार्थी गुरुसी ॥२॥
होता कंठ भरुनि दीन । गुरु विप्रा बोलावून । म्हणे इला जा घेऊन । तूं परान्न जेवाया ॥३॥
तीचें गार्‍हाणें ऐकून । तिच्या पतीस जा म्हणून । गुरु सांगे तो मानून । तिला घेऊन गेला तो ॥४॥
तेथें मानिनी जेवितां । श्वसूकरोच्छिष्ट देतां । उठे पतीसह दुश्चिता । गुरुनाथा भेटती दोघे ॥५॥
नारी विनवी क्षमापून । गुरु म्हणे धालें कीं मन । द्विज म्हणे नेम टाळून । भ्रष्ट होवून गेलों मीं ॥६॥
अवश्य ही वैरीण । गुरु म्हणे पुरें शीण । मी माया दावून । केलें मन शुद्ध ईचें ॥७॥
ही नच इच्छील आता । सोडील परान्नाची वार्ता । न मोडली तुझी निष्ठा । दि़ज अडतां घे परान्न ॥८॥
प्रार्थी भूसूर कोठें जावें । अन्न कोणाचें वर्जावें । गुरु म्हणे जेवावें । स्वसंबंधिगुरुमित्रान्न ॥९॥
वर्जी तामस कुचरान्न । विधिनिषेधरहितान्न । दुष्प्रतिग्रह दुर्भक्षान्न । कन्यान्न सुत न होता ॥१०॥
त्यजीं निन्दकादिकान्न । जेवितांही श्राद्धान्न । षट्‌ प्राणायाम शोधन । प्रेतान्न सर्वथा वर्जी ॥११॥
अग्नाधानिभागवतान्न । पवित्र करी ब्रह्मीष्ठान । तीर्थी क्षेत्री पर्वणीं दान । हीनदान कुदान न घे ॥१२॥
स्वाचारयुक्त नर । सर्व दोष करीं दूर । द्विज म्हणे सविस्तर । नित्याचार स्पष्ट सांगा ॥१३॥
गुरु यापरी प्रार्थित । सांगे पराशरमत । उठा ब्राह्ममुहूर्तांस । गुरुदेवतांदिकां वंदा ॥१४॥
व्हायाम्य मुख निशीं ऐक । दिवा संधी उदङ्‌मुख । नैऋत्यकोणी देख । मार्गोदकवर्जितदेशीं ॥१५॥
त्यजी हरित्तृण, शिरीं । वस्त्रधरीं जलदूरीं । मलमूत्रोत्सर्ग करीं । शौचकरी मृत्तोयानें ॥१६॥
गोळ्या मोठया आंवळ्यापरी । लिंगीं एकत्रि गुदावरी । सातसात पादकरीं । निम्मीं रात्री संकटी अर्ध ॥१७॥
हा द्विजवर्याचार । वर्णी वनी यतिश्वरां । द्वित्रिचतुगुर्णाचार । स्त्रीकुमारां दुर्गंधान्त ॥१८॥
होत साचविधी शूद्रा । विप्रें किजे चूळ बारा । आठ सहा चार ईतरां । अंतीं द्विराचमनें शुद्धीं ॥१९॥
मुदा पुण्य मध्यस्नान । प्रातःकाळीं गोमयस्नान । यति सन्यासी त्रिस्नान । सुभगे शिरःस्ना न नित्य ॥२०॥
शीतोष्णाम्बु गृहस्थासी । मार्जनादि न तयासी । तर्पणादि बहिःस्नानासी । कीजे शिरसीं मृद्धारण ॥२१॥
अनामिकीं दर्भ पवित्र । बद्धशिख सोपवस्त्र । संध्या करा जो प्रकार । गृह्यकार वदे जैसा ॥२२॥
मौंजी चौलादिकीं न भस्म । तदन्यत्र तें परम । सनक्षत्रसंध्या परम । हो मध्यम लुप्ततारा ॥२३॥
चाक्षुष सूर्यदर्शन । प्रातःसंध्या अधम जाण । ह्याउलट रात्रौ जाण । उपस्थान सूर्येक्षणें ॥२४॥
त्या आधी, आचमन । प्राणायाम मार्जन । मंत्राचमन मार्जन । अघमर्षण अर्ध्वदान ॥२५॥
मनस्समाधानें द्या तीन । कालात्यय चौथे जाण । सूर्योदयविघ्नकारण । रक्षोगण मरती ह्यांनीं ॥२६॥
ह्या दुर्वारास्त्रें मारितां । दोष येतो, भूमी फिरतां । असावादित्य जपतां । ये शुद्धता ब्राह्मणासी ॥२७॥
हो स्वस्से पानभूत । कर्म कीजे सदोदित । शुभासनीं न्यासहित । जपा स्मरत ऋष्यादिक ॥२८॥
जप मोजा अक्षमालेनें किंवा स्फटिकादिकाने । निष्फळ तो मुद्राविणें । समाधानें मौनें जपा ॥२९॥
लय भूल पडूं न द्यावी । छन्नमाला न पडावी । गायत्री हजार जपावी । कमी योजावे अशक्तत्वें ॥३०॥
वृद्धंत्वादि तारत्म्यें । जपिजे न धनकाम्यें । उभ्यानें दोन संध्ये । सायंसंध्येसी बसूनी ॥३१॥
उभें रहावें उपस्थानीं । दिशा देव द्विजां नमूनी । गुरुपादातें वंदुनि । विसर्जोनी द्यावी संध्या ॥३२॥
हो असा हा संध्याविधी । सायंप्रातर्होमविधी । कीजे स्वयें उदया आधीं । प्रादुष्करण मग होम ॥३३॥
हा आत्मस्त्री सुतादिकें । कीजे गव्यधान्यादिकें । धर्म करितां श्रमदुःखें । नच लेखे चित्ती विप्रा ॥३४॥
भोग कः पदार्थ द्विजा । कर्मे होयी शुद्धी निजा । आनंदा घे तोचि सहजा । देवपूजा हीच मुख्य ॥३५॥
होम असा झाल्यावर । ब्रह्मयज्ञ कीजे बाहेर । ब्रह्मांजळी सपवित्र । म्हणा मंत्र ब्राह्मण अंगें ॥३६॥
विद्या हंकारवर्जित । ब्रह्मयज्ञ दे मुक्तता । दोष नसें कसें पढतां । जपाल्पता अनध्यायीं ॥३७॥
कोणी वैश्वदेवोत्तर । करिती मध्यसंध्योत्तर । तर्पा देवर्षिपितर । सव्य निवीत्य पसव्येसी ॥३८॥
होविश्वात्माऽऽब्रह्मस्तंबांत । तर्पणें तृप्तयवाक्षत । देवर्षिलाकरिती तृप्‍त । पितरातृप्‍तकरिती तिला ॥३९॥
गृहीं न हें तिलतर्पण । निंद्यदिनीं मांगल्यीं न । दिवाळींत यमतर्पण । भीष्माष्टमीसी ॥४०॥
हें करो जीवत्पिता । दोष अनवश्य करितां । मध्यान्हीं सूर्य येतां । मध्यान्हसंध्या कीजे ॥४१॥
इति श्रीमत्परमहंसपरिव्राजकाचार्यश्रीमद्वासुदेवानंदसरस्वतिविरचिते सारे आन्हिककर्मनिरुपणं नाम षष्‍ट्‌त्रिंशोऽध्यायः

 

श्री गुरुदेव दत्त...!!!

Oct 05

सप्तशती गुरूचरित्र :: अध्याय पस्तीसावा

श्री वासुदेवानंद सरस्वती (टेंबे स्वामी) रचित "श्री सप्तशती गुरूचरित्र"


मंत्रोपदेश द्या मला । तेणें नित्य स्मरुं तुम्हांला । गुरु म्हणे स्त्री मंत्राला । पात्र न तिला पतिसेवा ॥१॥
अवश्य ऐकें ही कथा । देवी दैत्यां रणीं मारितां । तयां संजीवनी जपतां । वांचवितां होय भार्गव ॥२॥
अचिन्त्य मंत्रविद्याशक्ती । इंद्र सांगे शिवाप्रती । आणवून शुक्राप्रती । उमापती भक्षीतसे ॥३॥
तो त्याचे मूत्रद्वारा । पडे वांचवी पुनः क्रूरां । बृहस्पती म्हणे इंद्रा । बुडवू मंत्र षटकर्णेशी ॥४॥
असें तया बोलून । स्वसुता कचा दे धाडून । कपटी शिष्य होवून । शुक्रा सेवून तो राहे ॥५॥
न वासः शुभदो नोऽस्य । असे मानुनी दैत्य । मारिती त्या वांचवी काव्य । द्विवार कन्यास्नेहें ॥६॥
दैत्य यत्‍नें त्या जाळून । त्याचें भस्म मद्यातून । देती शुक्र पी नेणून । मग कन्था विरहें रडे ॥७॥
शुक्रदाही दिशा देखे । शेखीं कचा पोटीं देखें । म्हणे देवयानी ऐकें । त्या आणितां मी मरेन ॥८॥
कन्यादिव्यमंत्र मागे । म्हणे कचा वांचवीं वेगें । मग मी तूतें मंत्रयोगें । बापा वेगें वांचविन ॥९॥
देहा त्यजीन मी अन्यथा । अशी कन्योक्ति ऐकितां । आश्वासुनी मोहेंपिता । मंत्र देता झाला तिला ॥१०॥
तो मग जपे वाचार्थ । तो ये त्याचें फोडुनी पोट । कन्या ताता उठवीत । कचा क्षुत झाला मंत्र ॥११॥
मंत्रतंत्र प्रगट होता । तत्काल ये निर्वीयेता । शुक्रमंत्रा ये हीनता । आशा घेता झाला कच ॥१२॥
कन्या तेव्हां वरीं म्हणे । विद्या देऊनी दिल्हें जिणें । तूं भगिनी कच म्हणे । ती म्हणे विद्या विसर तूं ॥१३॥
कच जोरानें वदे तिला । विप्रावेगळा वरो तुला । शुक्र उपदेशी स्त्रीला । भ्रष्ट झाला मंत्र त्याचा ॥१४॥
ती द्विजपुत्री असतां । शापें झाली ययातिकांता । दोघां हानी मंत्र देतां । स्त्रिये ब्रता आचरावें ॥१५॥
ती मग म्हणे नाथा । व्रत एक सांगा आतां । गुरु म्हणे सोमव्रता । करितां सर्व सिद्धी होय ॥१६॥
हें सद्भावें करीं परम । आर्यावर्ती चित्रवर्म । तयासीमंतिनीनाम । हो उत्तम कन्यारत्‍न ॥१७॥
तियेस चौदा वर्षें होतां । ये वैधव्य हें कळतां । तिनें मैत्रेयी प्रार्थितां । सोमव्रता ती सांगे ॥१८॥
निश्चय मनीं धरुन । सोमवारीं उपोषण । किंवा नक्तभोजन । करिजे अर्चून गौरीशा ॥१९॥
दुरिते ही नाशा जाती । सौभाग्य सुत राज्यासी । दे शीघ्र गौरीपती । अर्चिता त्या प्रदोषीं ॥२०॥
हो दुःखित तरी व्रता । न सोडिजे सर्वथा । सीमंतिनी तें ऐकतां । करी व्रता दृढचित्ते ॥२१॥
दैवा लंघी कैसा कोण । चित्रांगदा ती देऊन । राजा गेहीं प्रेमें करुन । घे ठेवून त्या जामाता ॥२२॥
बुडे यमुनेत जामाता । कन्या प्राण त्यजूं उठता । वारुनि घरान्हें पिता । तरी व्रता ती न सोडी ॥२३॥
महच्चक्र काळाचें हें । कोणाचेनी दूर नोहे । तीचा श्वशुर शोकीं स्नेहें । त्या बांधून घे शत्रु राज्य ॥२४॥
त्या इंद्रसेनसुता । पाताळी न्हेति राजसुता । जीववुनी वासुकी वार्ता । पुसे, सर्व सांगे तया ॥२५॥
तया मग सर्पनाथ । म्हणे तुझें कोण दैवत । येरु म्हणे गौरीनाथ । मद्दैवत जगदीश ॥२६॥
तो त्यासि राहे म्हणे । चंद्रागद पाठवा म्हणे । मद्विरहें माता शिणे । पत्‍नी जिणें वेचिलची ॥२७॥
तो हय सर्पा सवे धाडी । वेगें आला यमुनाथडी । तेथ सीमंतिनी खडी । पाहतां वेडी हो तयासी ॥२८॥
हो सच्चा कीं हा मत्पति । ऐसें जंव चिंती चित्तीं । तों येवून तो पुढती । वार्ता तिची पुसे तो ॥२९॥
संलग्नौ दासिन्यदीना । कोण ही ऐसें पुसतां खुणा । लाजुनी म्हणे सखीजनां । सर्व खुणा वदा ॥३०॥
सखी तया सर्व सांगे । तो वदे ईचा पति वेगें । भेटेल हें न वावुगें । आण घे शंकराची ॥३१॥
स्वसत्तेनें सोडवी ताता । मायबापांची हरी चिंता । सीमंतीनीसी भेटता । झाला व्रताच्या प्रभावें ॥३२॥
भला जोडा तो शोभला । येउनी राज्जीं आरुढला । असें व्रतें दे शिव भोला । फल तिला गुरु म्हणे ॥३३॥
हें सावित्री व्रत तूं करीं । तथा म्हणुनी ती स्वीकारी । निरोपें ये स्वमंदिरीं । धवासव नारी भेटे स्वका ॥३४॥
सुबुद्धि हो त्या दोघांची । जसी वाचा श्रीगुरुची । फलप्राप्‍ती तसी हो साची । तै दुःखाची कैंची वार्ता ॥३५॥
इति श्रीमत्परमहंसपरिव्राजकाचार्यश्रीमद्वासुदेवानंदसरस्वतिविरचिते सारे सीमंतिन्याख्यानकथनं नाम पंचत्रिंशोऽध्यायः

 

श्री गुरुदेव दत्त...!!!

Oct 04

सप्तशती गुरूचरित्र :: अध्याय चौतिसावा

श्री वासुदेवानंद सरस्वती (टेंबे स्वामी) रचित "श्री सप्तशती गुरूचरित्र"


ते होत हे अक्षप्रिय । भूप म्हणें वदा भविष्य । मुनि म्हणे सप्ताहायुष्य तुझा तनय असे तरी ॥१॥
वेदान्तो पनिषत्सारा । रुद्रा विधी दे मुनिश्वराम । करी अधर्म संहारा । यमपुरा वोस करी ॥२॥
तज्जप्यनुभवा यम । कथी तया म्हणे ब्रम्हा । अभाविका हो अधर्म । भाविका शर्म दे हा रुद्र ॥३॥
मृत्यु कृतभय जाया । रुद्रें अर्ची मृत्युंजया । मग रुद्राभिषेक राया । द्विजवर्यां करवी करी ॥४॥
त्या सुता सातवे दिनीं । मृत्यु येतां तीर्थें मुनी । प्रोक्षी शिवदूत येउनी ! मृत्युदूतां पळविले ॥५॥
धर्मात्मा जो यम त्याप्रति । ते जाउनि सांगति । यम पुसे शैवांप्रती । ते म्हनती लेख पहा ॥६॥
तें मानोनी चित्रगुप्ता । करवीं लेख पहातां । यम हो भ्रांत शिवदूतां । क्षमा मागता झाला ॥७॥
गेलें नैमित्तिकारिष्ट । नृप विप्रां करी तुष्ट । तों नारद तें अदृष्ट । सांगे स्पष्ट ऋष्युपकार ॥८॥
महानंद सर्वां झाला । अयुतायू सुत जाहला । गुरु सांगे सतीला । ती गुरुला प्रार्थुनी म्हणे ॥९॥
इति श्रीमत्परमहंसपरिव्राजकाचार्यश्रीमद्वासुदेवानंदसरस्वतिविरचिते सारे रुद्राभिषेकफलकथनं नाम चतुस्त्रिंशोऽध्यायः

 

श्री गुरुदेव दत्त...!!!

Oct 03

सप्तशती गुरूचरित्र :: अध्याय तेहेतिसावा

श्री वासुदेवानंद सरस्वती (टेंबे स्वामी) रचित "श्री सप्तशती गुरूचरित्र"


ती आनंद भावे नमुनि । म्हणे काल भेटला मुनि । गुरु बोले मग हांसोनी । पालटोनी रुप मी आलो ॥१॥
तुझें परप्रेम पाहिलें । रुद्राक्ष मींच दिल्हे । रुद्रतीर्थें वाचविलें । ऐक बालें नवल हें ॥२॥
अवश्यं हे ल्यावे सादर । पूर्वीं काश्मीरेशकुमार । प्रधानाचाही कुमार । अलंकार टाकून देती ॥३॥
त्या भ्रांत्या पिसे म्हणती । भस्मरुद्राक्षातें धरिती । पराशरा पुसे नृपति । हेतू वदति मुनी भूपा ॥४॥
सर्वात्म शिवा हे भजती । नंदिग्रामीं वेश्यासती । वैश्यरुपें गौरीपती । ये ती प्रती वळखावया ॥५॥
अनन्य स्त्रीत्र्यह होऊन । रतिदानें घे लिंग कंकण । तो बोले लिंगनाशन । होतां प्राण त्यजीन मी ॥६॥
त्याच्या वचना मानून । मंडपीं ठेवी लिंगरत्‍न । रमे वेश्या गृहीं नेऊन । जळे लिंगासह मंडप ॥७॥
वैश्य स्थिरवून मन । लिंग जळाले पाहून । करी अग्निप्रवेशन । सर्व दान देई वेश्या ॥८॥
निघे तंव लोक म्हणती । वेश्ये घरीं किती येती । कोणाची तूं कशी सती । नायकतां ती आग रिघे ॥९॥
तैं होय शिव प्रसंन्न । तिला नेयी उद्धरुन । तिणे जे रुद्राक्ष ल्येवून । कुक्कुट मर्कट पाळिले ॥१०॥
इति श्रीमत्परमहंसपरिव्राजकाचार्यश्रीमद्वासुदेवानंदसरस्वतिविरचिते रुद्राक्षमहिमावर्णनं नाम त्रयस्त्रिंशोऽध्यायः

 

श्री गुरुदेव दत्त...!!!

◄ Older PostsNewer Posts ►
Start Jap Online