Oct 02

सप्तशती गुरूचरित्र :: अध्याय बत्तिसावा

श्री वासुदेवानंद सरस्वती (टेंबे स्वामी) रचित "श्री सप्तशती गुरूचरित्र"


परतंत्र न रहावें । धवासवें सतीनें जावें । पदोपदीं मेघफल घ्यावें । स्थान घ्यावें पतिलोकीं ॥१॥
किंवा विधवाधर्म । पाळितां ही ये शर्म । पोर असतां कीजे भर्म । राहिजे ब्रह्मचार्‍यापरी ॥२॥
स्वल्प मूलही असतां । पोटीं गर्भ असतां । पतिशव न मिळतां । सवें जाता दोष असे ॥३॥
ज्या मूढा केश राखती । धवासह त्यां हो दुर्गती । अतएव मरता पति । करो ती केशवपन ॥४॥
शयना तें खाटेवरी । जी करी जाय ती नारी । नरकीं यास्तव भूमिवरी । निजो नारी एकाहारा ॥५॥
भूषानु लेप तांबूल । त्यजुनी राखीजे शील । नेसावे शुभ्र चैल । मंगलस्नान वर्जावे ॥६॥
विष्णु पतिसम मानून । कीजे वैधव्य आचरण । न कीजे नरवीक्षण । चांद्रायण शक्‍त्या कीजे ॥७॥
अवश्यं भावि होईजे । त्याचा शोक नच कीजे । मासव्रत पाळिजे । माघ ऊर्ज वैशाखीं हो ॥८॥
सुमति जी वागे ऐसी । सहगमनवत् फल तीसी । जायी घेउनी पतिसी । स्वर्गीं ऐसी गुरुक्ती हे ॥९॥
म्हणे पतिव्रता मातें । वैधव्य हें न रुचतें । तारुण्य हें विघ्नातें । देई असें माते वाटे ॥१०॥
अवश्यं कुरु ऐसे । बोलुनी तो देतसे । चार अक्ष भस्म परीसें । म्हणतसे त्या सतीतें ॥११॥
हे भूति शिरीं लावून । पतीकर्णी अक्ष बांधून । गुरुदर्शन घेऊन । सहगमन करीं मग ॥१२॥
तो आज्ञा अशी देवुन । गेला, साध्वी दानें देऊन । पतिशवा नेववुन । अग्नि घेऊन पुढें चाले ॥१३॥
पाहुन नारी म्हणती । केश साडेतीन कोटी । होमुनी स्वर्गी घे ती । वर्षकोटी प्रतिकेशा ॥१४॥
सर्व चमत्कार पाहाती । स्मशानी ये मंदगती । अग्नि सिद्ध करोनी ती । आठवी चित्तीं उपदेशा ॥१५॥
स्वचक्षुनें गुरु पाहून । म्हणे सहगमन करीन । विप्रें शीघ्र ये म्हणून । वदताम मनस्विनी गेली ॥१६॥
जै उषःकाळी विजन । गजबजती तैसे जन । सवें येती गजबजून । गुरुस्तवन मार्गी करी ॥१७॥
सती यतीशा पाहून । करी साष्टांग नमन । पंचपुत्रा हो म्हणून । आशीर्वचन दे गुरु ॥१८॥
हें स्वतंत्र बोलतां जन । देती साद्यंत सांगून । गुरु प्रेता आणवून । करी स्नपन रुद्रतीर्थें ॥१९॥
तव तो उठोनी बैसला । नग्न म्हणूनी लाजला । सर्व लोकां हर्ष झाला । न मावला साध्वी देही ॥२०॥
दैवयोगे स्वर्णघट । रंका मिळतां अवचट । हर्ष हो तेवी तिला स्पष्ट । उत्कट हो हर्ष तेव्हां ॥२१॥
प्रेमागिरा दोघें स्तविती । श्रीगुरु वर देती । गेले दोष ये सद्‌गती । लोहां गती जेवी परीसे ॥२२॥
लिहीन याला विधी लेख । धूर्त पुसे गुरु म्हणे ऐक । पुढचा शतायुष्यलेख । दिल्हा सम्यक मागून मी ॥२३॥
मनश्वैत्य गुरु असें बोले । लोकीं जय शब्द केले । दंपतीनें स्नान केले । मठी आले गुरु त्यासह ॥२४॥
इति श्रीमत्परमहंसपरिव्राजकाचार्यश्रीमद्वासुदेवानंदसरस्वतिविरचिते सारे प्रेतसंजीवनं नाम द्वात्रिशोऽध्यायः

 

श्री गुरुदेव दत्त...!!!

Oct 01

सप्तशती गुरूचरित्र :: अध्याय एकतिसावा

श्री वासुदेवानंद सरस्वती (टेंबे स्वामी) रचित "श्री सप्तशती गुरूचरित्र"


म्हणे तंद्रि सोडुनि ऐक । वाढे विंध व्यापी अर्क । तेव्हां जाती वृंदारक । काशीमध्यें तद्‌गुरुपाशीं ॥
स्तवि वाक्पति अगस्त्यातें । लोपामुद्रा साध्वीतें । त्वत्सम नान्या पतिव्रते । पतिदेवते तूं धन्या ॥२॥
कदापि न स्वतंत्रता । पतिसेवननिरता । छायेपरी पतिदेवता । पतिव्रता ती पतिचित्ता ॥३॥
जेवी भुंजीता पति । पतिपूर्वीं स्नान करी ती । उठे आधीं निजे उपरांती । न बसे ती पतिपुढें ॥४॥
जी न जाय घराबाहेर । करीपत्युच्छिष्टाहार । पतिवचनीं जी सादर । निरंतर अनुकुल ॥५॥
जी आनंदे दैवलाभें । वस्त्रभूषणीं न क्षोभे । धर्म सोडिना देहलोभें । ती शोभे निजधर्मे ॥६॥
न घे वार्ता श्रीमंताची । मर्यादा धरि वडिलांची । स्वातंत्र्यें ती व्रताची । आशा साची नच करी ॥७॥
देव गुरु सर्व पती । मानुनी वाद न करिती । पतिसवें ज्या भांडती । भालु होती भुंकती त्या ॥८॥
न कोणासीं भेद कीजे । धवा वंचुनी खाइजे । वृक्षीं लोंबे वागुळी जे । खायी निज मळमूत्र ॥९॥
धर्मान्वित राहतां । दैवें पति मरतां । सवें जाय पतिव्रता । न वियुक्ता छायेपरी ॥१०॥
इति श्रीमत्परमहंसपरिव्राजकाचार्यश्रीमद्वासुदेवानंदसरस्वतिविरचितेसारेपतिव्रताधर्मनिरुपणं एकत्रिंशोऽध्यायः

 

श्री गुरुदेव दत्त...!!!

Sep 28

सप्तशती गुरूचरित्र :: अध्याय तिसावा

श्री वासुदेवानंद सरस्वती (टेंबे स्वामी) रचित "श्री सप्तशती गुरूचरित्र"


दत्ताधिष्ठित माहोर । तेथें गोपीनाथ विप्र । तया होउनी मेले पुत्र । दत्तवर वांचवी एक ॥१॥
ते निष्ठा दत्तावर । ठेउनी करिती संस्कार । त्याचा विवाह केला थोर । हर्षे सादर मायबापें ॥२॥
त्यां होय रुप समान । साजे जोडें देवासमान । पतिसेवेवांचून । सतीमन न विसंबे ॥३॥
सून महा पतिव्रता । तयां हर्ष हो पहातां । तंव आली दुर्दैवता । रोग सुता त्या हो असाध्य ॥४॥
होऊन क्षयरोग । क्षीण झालें पतिचें आंग । जेवीना तो तसी चांग । सती हो रोग नसतांही ॥५॥
हो पश्चात्ताप द्विजांला । व्यर्थ वरिली सुभगेला । म्हणे तुझा भोग सरला । माहेराला जांई सुखें ॥६॥
ती भयंकर वाचा । ऐकून म्हणे तुमचा । जेथ देह तेथ हा साचा । असे तुमचा अर्धात्मा हा ॥७॥
नसो वियोग म्हणून । सासुसासर्‍यां प्रार्थून । धवा घेऊन डोंळींतून । ये गाणगाभुवना ॥८॥
त्रिदोष वाढुनी जाण । द्विज झाला गतप्राण । सती उठे द्याया प्राण । निवारण करी जन ॥९॥
तीं तयाचे आठवी गूण । रडे शीर्ष आपटून । म्हणे रुसे गौरिरमण । कोण चोरुन ने सौभाग्या ॥१०॥
जैं धेनु जातां शरण । राखुनि घे यवन प्राण । भेटूं जातां देवा पडून । टाकीं चुरुन देऊळ कीं ॥११॥
तेणें अप्री झालें मज । देवा शरण येतां आज । न राखसी माझी लाज । देवा तुज कींव न ये कीं ॥१२॥
ती असे करी विलाप । तंव आला आपोआप । तो दीनाचा मायबाप । गुरु रुप पालटोन ॥१३॥
तीसि वदे कां रडसी । जीव ये कीं रडतां यासी । मायामय संबंधासी । व्यर्थ म्हणसी पति मेला ॥१४॥
देव तेही काळाधीन । तुम्ही तरी मर्त्य जाण । पाहूं जातां विचारुन । मेला कोण कोण जन्मला ॥१५॥
देह उत्पन्न होऊन । मरे त्याहुन विलक्षण । आत्मा निंत्य विकारहीन । संबंधी न कवणाचा तो ॥१६॥
त्या उत्क्रान्तीव्यापकाकैंची । वार्ता न त्या संबंधाची । नदीकाष्टवत्‌ हो देहांची । भेटी हेची कर्मयोगें ॥१७॥
ह्या अमंगळ देहाच्या । तादात्में भ्रम कर्मांचा । गुणमूल अज्ञानाचा । हो कीं साचाम परिणाम ॥१८॥
तूं अतंद्रित होऊन । दे हा संबंध सोडून । जेणें जासी उद्धरुन । तें साधून घेई शीघ्र ॥१९॥
रक्तास्थि मांसा न रडें । हें ऐकून ती पायां पडे । म्हणे बापा शोकीं पडे । काढा कडे सोयरे तुम्हीं ॥२०॥
इति श्रीमत्परमहंसपरिव्राजकाचार्यश्रीमद्वासुदेवानंदसरस्वतिविरचिते सारे प्रेतांगनाशोको नाम त्रिंशोऽध्यायः

 

श्री गुरुदेव दत्त...!!!

Sep 27

सप्तशती गुरूचरित्र :: अध्याय एकोणतिसावा

श्री वासुदेवानंद सरस्वती (टेंबे स्वामी) रचित "श्री सप्तशती गुरूचरित्र"


बरवा प्रश्न ऐकून । गुरु म्हणे भस्में ज्ञान । दिधलें तें धूतां जाण । जाऊन हो अज्ञानी ॥१॥
पूर्वयुगीं वामदेव । क्रौंचवनी घेयी ठाव । त्या पाहुनि घेयी धांव । दुर्भाव तो राक्षस ॥२॥
तो दुर्गंधांगीं तेव्हां । धरी भक्षूं वामदेवा । भस्म लागतां दुर्भावा । त्यजुनी भवा पूर्वा स्मरे ॥३॥
तृटक्षुधा शांत झाली । म्हणे । पंचवीस आपुलीं । स्पष्ट जन्में म्यां स्मरलीं । भूपकुलीं मी दुर्जय ॥४॥
धरुनि मी भोगीं स्त्रिया । राज्यमदें करुनियां । चारीं वर्णांच्याही भार्यां । भोगीं वेश्या असंख्यांत ॥५॥
अविवाहितांही भोगीं । रजस्वलाही न त्यागी । पुढें दैवें झालों रोगी । शत्रू वेगीं घेती राज्य ॥६॥
दुराशयें पाप केलें । स्त्रियांनीं बहु शापिलें । क्षयरोगें ग्रासियलें । अंतीं आले यमदूत ॥७॥
अपयात्‌ क्षय आयुषः । हें कळलें निर्दोष । मी मरतां यमपुरुष । न्हेती दोष क्षाळांवया ॥८॥
भीदेश्रोत्रा यातना ती । पित्रांसह भोगुनी अंतीं । अंगीं शिश्नें हजार होती । प्रेतगती ये ती मला ॥९॥
तें गात्रही सोडून । मी चोवीस भोगीं योनी । ब्रह्मराक्षस होउनी । राहें वनीं सदा भुका ॥१०॥
ह्या पञ्चविसाव्या जन्मीं । गजा खातांही भुका मी । स्पर्शमात्रें शांतीं तुम्हीं । दिल्ही तुम्ही साक्षा देव ॥११॥
गेले क्षुत्पिपासादि । याचा हेतू सांगा आधीं । वामदेव म्हणे शुद्धी । झाली आधी गेला भस्में ॥१२॥
भस्म स्पर्शें एक जाण । द्राविड जार ब्राह्मण । त्यजिला शूद्रें मारुन । ये श्वान त्यावरि एक ॥१३॥
श्वस्पर्शनें तदंगस्थ । भस्म लागुनी झाला मृत । त्यांतें न्हेती यमदूत । शिवदूत सोडविती ॥१४॥
त्या सानंदें कैलासातें । न्हेता यम आला त्यातें । धर्म सांगून विप्रातें । दूत न्हेतें झाले तया ॥१५॥
शंभुच जाणें तन्महात्म्या । भस्म लावीं मी सर्वकाया । लागलें किंचित्‌ तुझ्याकाया । ज्ञान तया योगें हो हें ॥१६॥
वदे रक्ष राज्य करितां । वापी केल्या निर्जळपंथा । विप्रांवृत्ति दिधल्या आतां । आलें हातां त्याचें फळ ॥१७॥
सांगे सविस्तर मला । भस्मधारण विधीला । वामदेव म्हणे शिवाला । प्रश्न केला हा कुमारें ॥१८॥
मग नंदीगौरीयुक्त । शिव बसे देवासहित । सनत्कुमार वंदुनी तेथ । करीतसे हा प्रश्न ॥१९॥
भो व्याघ्राजिनवास । चतुर्विध पुमर्थास । देई शीघ्र असें आम्हांस । सांगा खास स्वल्प साधन ॥२०॥
त्यां म्हणतसे ईश । धारण करीं भस्मास । चतुर्विध पुमर्थांस । दे हें खास सुसाधन ॥२१॥
नगमे ऐसें सुसाधन । गोमयें अग्निहोत्रांतून । भस्म घेई करीं धारण । भृसमान त्रिपुंड्रेसी ॥२२॥
हो नव देवादिक । एका एका पुंड्री देख । मध्यांगुष्टानामिका । काढीं रेखा शीर्षादिकीं ॥२३॥
हो हेंच पापशमन । असें वामदेव सांगून । करवी भस्मधारण । उद्धरुन गेला राक्षस ॥२४॥
गुरु असें सांगती । सर्व आनंदीत होती । गेला त्रिविक्रमयती । कथा पुढती सांगो ऐक ॥२५॥
इति श्रीमत्परमहंसपरिव्राजकाचार्यश्रीमद्वासुदेवानंदसरस्वतिविरचिते सारे भस्ममहिमावर्णनं नाम एकोनत्रिंशोऽध्यायः

 

श्री गुरुदेव दत्त...!!!

Sep 26

सप्तशती गुरूचरित्र :: अध्याय अठ्ठाविसावा

श्री वासुदेवानंद सरस्वती (टेंबे स्वामी) रचित "श्री सप्तशती गुरूचरित्र"


जो दूरी त्यजी धर्मास । मायाबापदेवगुरुस । निर्दोष स्त्रीपुत्रास । चोर असत्यवादी जो ॥१॥
जो निरंतर अशुद्ध । हरिहरां करी भेद । हो पाखंड दुर्वाद । पंक्तिभेद करी खळ ॥२॥
मारी यत्‍नें जीवा क्रूर । जाळी वनग्रामघर । विकी कन्या गोरस मंत्र । फिरवी विप्रअतिथीतें ॥३॥
जो निंदक श्राद्धातें । न करी फोडी कूपांतें । तोडी मार्गाश्रयवृक्षातें । जेवी व्रतातें सोडून ॥४॥
जो दिवापर्वणीं स्त्रीशीं । भोगी रमे परस्त्रीसी । करी विश्वासघातासी । दत्तदानासी घे पुनः ॥५॥
जो स्वप्नोपमसुखार्थ । मारणादि करी व्यर्थ । परतापी करी अनर्थ । नाडी नेणत दे औषध ॥६॥
तो पतित होयी मांग । जो करी वृषलीसंग । करी स्नानसंध्यांत्याग । पंचयाग टाकून जेवी ॥७॥
जो होय वृत्तिरत्‍नहर्ता । दुष्प्रतिग्रही दुर्भोक्ता । मद्य पीतां ये हीनता । अनुतप्ता दोष थोडा ॥८॥
जो लुच्चा जिती विप्रात । हूं तूं करी पितृगुरुंस । तो होयी ब्रह्मराक्षस । हो वायस निर्मंत्राशी ॥९॥
तो कप्युदरीं जन्म घे । चोरुनि जो फळपत्र घे । जो धन चोरुनि घे । जन्म घे तो उंटाचें ॥१०॥
हो उत्क्रान्तीनंतर । नरकवास घोर । ह्या योनी त्या नंतर । दंभकर बगळा हो ॥११॥
माशी मधुहर उंदीर । धान्यहर जळहर । चातक पशु तृणहर । स्वर्णहर कृमिकीट ॥१२॥
दुर्गती आधीं भोगून । होतां पुण्यपाप समान । अंधपंग्वाद्यघचिन्ह । ये घेऊन येथें पुन्हां ॥१३॥
कृमीश्व खर जारकर्मे । स्त्री नरां गती हे दुष्कर्में । जे वागती सत्कर्मे । स्वधर्में तरती ते ॥१४॥
हो परःस्पर दंपती । दोषी ऐसें गुरु बोलती । पुसे त्रिविक्रम निष्कृती । सांगती गुरु तया ॥१५॥
तरी गृहीत ब्रह्मदंड । शरण विप्रां पापखंड । हो होता पाप उदंड । कृच्छ्रमुंडपूर्वक कीजे ॥१६॥
शक्तिहीनें गोधन द्यांवे । जप यात्रा होम करावे । शक्तें चांद्रायण करावें । गव्य प्यावें अनुतापें ॥१७॥
स्वात्मत्वैश्वर्ययुक्त । गुरु वारी सर्व दुरित । पितृत्यागें हो पतित । होई पूत मासस्नानें ॥१८॥
पतितानें ते ऐकून । म्हटलें मी झालो पावन । घ्या विप्रांत मेळवून । ते ऐकून गुरु म्हणे ॥१९॥
होऊनि नृप विश्वामित्र । सायासें झाला पवित्र । तूं हीन वेदापात्र । ये परत्र विप्रकुळीं ॥२०॥
तो आसंन येतां स्त्रीला । स्पर्शभयें मारुं आला । गुरु म्हणे त्यजीन स्त्रीला । तो म्हणाला हीन होउं कीं ॥२१॥
तेतया अंगींची विभूती । लुब्धा हातीं धुवविती । ज्ञान जाउनी त्या ये भ्रांति । घरा प्रति गेला सस्त्रीका ॥२२॥
प्रणति करी त्रिविक्रम । म्हणे वारा माझा भ्रम । अंग धूता ज्ञान उत्तम । जाउनी भ्रम त्या हो केंवी ॥२३॥
इति श्रीमत्परमहंसपरिव्राजकाचार्यश्रीमद्वासुदेवानंदसरस्वतिविरचिते सारे कर्मविपाककथनं नामअष्टाविंशोऽध्यायः

 

श्री गुरुदेव दत्त...!!!

◄ Older PostsNewer Posts ►
Start Jap Online